ग्रामोफोन रेकॉर्डस् (ध्वनिमुद्रिका)च्या माध्यमातून ‘गोठवलेलं संगीत’ मागील शतकभर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवीत होतं. त्यातील सत्तरहून अधिक वर्षांचा कालखंड हा तीन-साडेतीन मिनिटांच्या लाखेच्या तकलादू ध्वनिमुद्रिकांचा होता. तीनएक लाख ध्वनिमुद्रिकांचा तपशील व अभ्यास हे भावी संशोधकांसाठी मोठेच आव्हान आहे. पण त्यासाठी फारच मर्यादित सामग्री उपलब्ध आहे. साधारणपणे १९९० नंतर या विषयावर जाणीवपूर्वक अभ्यासाला सुरुवात झाली. गेल्या वीसेक वर्षांत विविध भारतीय भाषांत व इंग्रजीतही पुष्कळ साहित्य प्रकाशित होत आहे. प्रस्तुत पुस्तकातले छोटेखानी लेख ७८ गतीच्या त्या जुन्या कालखंडात घेऊन जातील. प्रत्येक लेख तीनएक मिनिटांत वाचून होईल, पण त्यात तीन मिनिटांच्या गोळीबंद गाण्याची खुमारी सामावलेली आहे.
सुरुवातीच्या काळातील तंत्रज्ञ, कलावंत आणि गायकी याचबरोबर संग्राहक या नात्याने त्यांचे जाणलेले महत्त्व, विविधता आणि रंजक अनुभव वाचकांना वेगळ्या जगात घेऊन जाणारे आहेत.
- डॉ. सुरेश चांदवणकर