लक्ष्मण हसमनीस यांच्या ह्या कथा वास्तववादी असल्या तरी हे वास्तव बालबोध नाही. वास्तवाच्या पलीकडे असणार्या गूढ, अनाकलनीय मानवी मनाचा त्या शोध घेतात. त्याचप्रमाणे हे वास्तव एक संवेदनशील आकलनही आहे हे लक्षात येते. माणसांच्या जीवनातील, विशेषत: स्त्रियांच्या जीवनातील सुख-दु:ख, मान-अपमान ह्या गोष्टी स्वच्छ व शांत नजरेनं लेखकानं टिपल्या आहेत; त्यामुळेच हे केवळ मानवी जीवनाचे प्रतिबिंब न राहता मूळ आकृती व त्यातून उभी राहिलेली ही कलाकृती अतिशय उन्नयीत झाली आहे. हसमनीस यांच्या ‘सांजस्मृती’ या पुस्तकाची दखल मान्यवर समीक्षकांनी, साहित्यिकांनी घेतली होती. ह्याही पुस्तकाचे वाचक स्वागत करतील. ह्या कथासंग्रहामुळे एका सकस कथासंग्रहाची भर मराठी साहित्यात पडली आहे.