अशी सहजच नाही फुलली माझी कविता सगळी पानझड सोसावी लागली तिला कुरूप वाटावे अस्तित्वच अवघे इतके निष्पर्णही व्हावे लागले तिला अंत:करणातली सल तिने मूकपणे सोसली विजनवासात ती निमूट राहिली आर्ततेच्या खोल मातीत ती आपसूक रुजली दु:खाच्या बोडक्या फांदीवर मग गाभ्यातून उमलली सोसल्या तिने थंडपणे तप्त उन्हाच्या झळा अथांग अंधारात वावरताना सृजनाच्याही कळा आनंदमयी केला तिने वेदनेचा हुंकार आशावादी राहिली ती पचवताना नकार भावनांच्या दुष्काळातही एकेक हिरवी काडी शोधून विणलेला, बाभळीवरला खोपा माझी कविता म्हणजे डोंगरकपाऱ्यातून, ग्रीष्मकाहिली सोसून, फुलणारा एकला देवचाफा. देवचाफ्याच्या फुलासारख्या शुभ्र, नितळ, नाजूक अन् निरागस नजरेनं भावविश्व न्याहाळणाऱ्या - मनातल्या सच्च्या भावनांना प्राणस्वर बनवून शब्दांच्या ताटव्यांत फुलवणाऱ्या - अंतर्नादाचे आर्त सूर साकारणाऱ्या अंतर्मनाच्या तारा छेडणाऱ्या कविता.