दलित साहित्याची निर्मिती ही आपल्या सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. दलित कविता हा त्या प्रवाहाचा एक मध्यवर्ती भाग आहे. धगधगत्या अनुभवाचे सामर्थ्य आणि प्रातिभता दलित कवितेत एकवटलेली दिसते. हे प्रातिभ सामर्थ्य उलगडून दाखविण्याचा प्रयत्न येथे प्रा. म. सु. पाटील यांनी केला आहे. दलित कवितेचे वेगळेपण सामाजिक संदर्भाशी निगडित आहे. प्रारंभीच्या काळात ज्या थोड्या समीक्षकांचे लक्ष ह्या साहित्य प्रवाहाकडे गेले, त्यात प्रा. म. सु. पाटील यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांचे हे योगदान महत्त्वपूर्ण आहे. दलित कवींचे अनुभवद्रव्य वेगळे आहे. ह्याला साजेशी साहित्यरूपे देताना काही वेळा मर्यादा येतात. ह्या मर्यादा स्पष्ट करतानाच नव्याने लिहू इच्छिणार्या कवींना प्रा. पाटील यांनी सावध केले आहे. दलित कवींचे सामर्थ्य अधिक लखलखीत स्वरूपात पुढे यावे यासाठी प्रा. पाटील यांनी येथे केलेला प्रयत्न अनेकांना मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.