‘आई’ होणं हा एक विलक्षण अनुभव असतो. सामान्य स्त्रीलासुद्धा हे मातृत्व असामान्यत्वाच्या मखरात नेऊन बसवतं! ‘चिकन सूप फॉर द सोल : इंडियन मदर्स’मध्ये मातृत्वाला मानाचा मुजरा केला आहे. एक आई – तिची अनेक रूपं, अनेक भूमिका – कधी ती कुशल ‘दूत’ असते, मुलाचं प्रेमानं पालनपोषण करणारी माता असते, कधी ती मार्गदर्शक असते, मुलांना खाऊपिऊ घालणारी, चांगलंचुंगलं आपल्या हातानं करून वाढणारी सुगरण असते, तर कधी चक्क ‘समुपदेशक’ बनून मुलांना समजून घेते, समजावून सांगते. बायकांना आपलं गर्भारपण, क्वचित प्रसंगी मूल गमावणं इथपासून मुलांबाबतचे चमत्कार, विजयाचा आनंद आणि ‘आजी’ होण्याचा सर्वांत मोठा मान मिळणं, अशा विविध गोष्टींबद्दल बोलायला आवडतं. अशाच विविध स्त्रियांचे मनाला स्पर्श करून जाणारे, तर कधी मनात घर करून राहणारे अनुभव म्हणजे हे पुस्तक! रक्षा भारदिया – ‘चिकन सूप फॉर द इंडियन सोल’, ‘चिकन सूप फॉर द इंडियन टीन एज’ आणि ‘चिकन सूप फॉर द इंडियन आम्र्ड फोर्सेस सोल’ या बेस्ट सेलर पुस्तकांच्या संपादक आहेत. तसेच ‘मी : हॅन्डबुक फॉर लाइफ’, ‘ऑल अॅन्ड नथिंग’ आणि ‘रूट्स अॅन्ड विंग्ज’ या पुस्तकांच्या लेखिका आहेत.