विवर आता चांगले सहा फूट रुंद आणि तितकेच खोल झाले होते. ते आमच्यापासून दूरही गेले होते. आम्ही त्याच्या दिशेने पळत निघालो. सोनिया पाठमोरी झाली. पाय खाली सोडून काठावर काहीक्षण हातावरच लोंबकळत राहिली आणि मग तिने हात सोडले. तिच्या मागोमाग मी आणि श्रीनंद खाली उतरलो. आमची तिघांची आत अगदी गर्दी झाली होती; पण काही वेळातच विवर रुंद आणि उंच होऊ लागले. भिंती आमच्यापासून दूर जात जात उंच होऊ लागल्या.ते विवर रुंद होतच होते. मघापेक्षा यावेळी हालचाल खूपच शीघ्र होती. लवकरचं आम्ही एका खूप मोठ्या खोलगट-दरीत उभे होतो. तिचा व्यास नक्कीच एखाद्या मैलाचा तरी वाटत होता.या विशाल दरीच्या तळावर दगड, धोंडे, फत्तर इतस्तत: विखुरले होते आणि मधूनच एखादे पाण्याचे डबकेही होते. एवढ्यातच पाऊस होऊन गेला होता!मग आश्चर्याचा धक्का बसून मला सत्यस्थिती उमगली हे एक नवीन जगच होते!चमत्कारिक, विस्मयकारक नवे जग!