‘विंचवाचं तेल’ म्हणजे ‘गुन्हेगारी जमाती’विरुद्ध वापरलं जाणारं जहाल अस्त्र. बाहेर याला ‘सूर्यनारायण तेल’ म्हणूनही ओळखतात. पोलीस खातं आरोपीने केलेले, न केलेले गुन्हे कबूल करावेत यासाठी ‘थर्ड डिग्री’मध्ये या तेलाचा वापर करतं.आरोपीच्या लिंगाला हे तेल लावलं जातं. त्यामुळे लिंगाला सूज येते आणि प्रचंड दाह होतो. तुमची सृजनताच मारून टाकायची… उद्ध्वस्त करायची…पोलीस डिपार्टमेंटचं हे विंचवाचं तेल या समाजव्यवस्थेने… या संस्कृतीने साऱ्या बहुजन समष्टींसाठी विशेषत: दलित भटक्या-विमुक्तांविरुद्ध नाना रूपात वापरलंय… तर याच समष्टीतील ही पोर… सुनीता भोसले… पारधी या ‘गुन्हेगार’ असा शिक्का बसलेल्या जमातीत तिचा जन्म झाला. पारधी असल्याचे भोग तिलाही सुटले नाहीत. पण पोर बहाद्दर… तिने या ‘विंचवावर’ जालीम उपाय शोधला… तो म्हणजे भारतीय संविधानाचा! जयभीमच्या नाऱ्याचा!समस्त पारधी समष्टीत भिनलेलं विष उतरवण्याचा प्रयत्न वयाच्या अकराव्या वर्षापासून करणाऱ्या या कार्यकर्तीची ही ज्वलंत जिंदगानी… विंचवाचं तेल !