स्त्रियांचे प्रश्न हे हजारो वर्षापासून स्त्रियांवर होणाऱ्या संस्कारांमुळे तिला आलेले मानसिक व शारीरिक पंगुत्व , दोर्बाल्य, समाजस्वास्थ व धर्मव्यवस्था एवढ्याच कारणाने निर्माण झालेले नसतात. त्याला समाजकारण, राजकारण , सांस्कृतिक व धार्मिक दहशतवाद हेही कारणीभूत असतात. गेली अनेक शतके भारतात असलेल्या हिंदू - मुस्लीम ताणामुळे या प्रश्नाला एक वेगळेच परिमाण मिळाले असून त्याची दाट काळी सावली मुस्लीम स्त्रियांच्या जीवनावर पडलेली आहे. या पाश्वभूमीवर प्रतिभा रानडे यांचा हा ग्रंथ महत्वपूर्ण आहे. स्त्रीकडे पाहण्याचा धर्माच्या धारणेपासून आजच्या पुरोगामी व सुधारणावादी चळवळीतील कार्यकर्त्याच्या मनोभूमिकांचा वेध घेणाऱ्या या अभ्यासपूर्ण ग्रंथांचे मोल अनन्यसाधारण आहे. परंपरा आणि नवता यातील संघर्ष कालसापेक्ष बदलत असला तरी त्यातून निर्माण होणारा काहीसा गुंता समाजशास्त्राच्या व स्त्री - प्रश्नाच्या अभ्यासकांसाठी एक आव्हान स्वीकारून प्रतिभा रानडे यांनी हा ग्रंथ अतिशय ओघवत्या व शैलीदार भाषेत सिद्ध केला आहे.