एके काळी जंगलाचे राजे म्हणविणार्या आदिवासींचे जगण्याचे स्वातंत्र्य ब्रिटिश सरकारने काढून घेताच या शूर जमातीने बलाढ्य सत्तेविरुद्ध जो संघर्ष केला, त्याची पुरेशी नोंद आमच्या इतिहासकारांनी त्याकाळात न घेतल्याने आदिवासी वीर तंट्या भिल्ल आणि बिरसा मुंडासारख्या वीरनायकांचा इतिहास झाकून राहिला.कोणताही इतिहास जसा जुन्या कागदपत्रांत दडलेला असतो तसाच तो जनसमूहाच्या हजारो जिभांतून मौखिक परंपरेने पुढे येत असतो. असाच बिरसा मुंडा जो जनचेतनेचे विद्रोही रूप म्हणून पुढं आणण्याचं काम डॉ. विनायक तुमराम यांनी केलं आहे.आदिवासी वीरांनी जुलमी सत्तेला नकार दिला. प्रस्थापित सत्ता मोडून पर्यायी व्यवस्था उभी केली. संघटित प्रतिकार लढा उभा केला. गुन्हे ठरणार्या कृती क्रांतीचा कार्यक्रम म्हणून स्वीकारला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. ही सबाल्टर्न लढ्यांची नीती तंट्या भिल्ल आणि बिरसा मुंडा यांनी अवलंबून बलवान सत्तेला जेरीस आणले.या विषयाचा शोध डॉ. तुमराम यांनी ‘धरती आबा : बिरसा मुंडा’ या चरित्रग्रंथात घेतला आहे. एका आदिवासी जननायकाची अन्याय, अत्याचार, सामान्यांचे शोषण या विरुद्ध संघटित विरोधाची ही कहाणी आजही प्रेरणा देणारी आहे.– बाबा भांड