भाषेच्या अभ्यासाचे क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. आधुनिक भाषाविज्ञानाने अनेक कारणांकरता आज महत्त्व धारण केलेले आहे. हे लक्षात घेऊनच मुंबई विद्यापीठ, एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ व मराठवाडा विद्यापीठ इत्यादी विद्यापीठांनी आपल्या मराठीच्या अभ्यासक्रमात आधुनिक भाषाविज्ञानाचा जाणीवपूर्वक समावेश केलेला आहे. हे विद्यापीठीय अभ्यासक्रम नजरेसमोर ठेवूनच, मालशे-पुंडे-सोमण यांनी हे पाठ्यपुस्तक परिश्रमपूर्वक तयार केले आहे. भाषेचे स्वरूप, स्वनविज्ञान, मराठीचा स्वनिमविचार,पदविन्यास, वाक्यविन्यास यांच्या सुबोध परिचयाबरोबर प्रमाण भाषेची संकल्पना, मराठी व तिच्या बोली आणि मराठीचा शब्दसंग्रह यांही घटकांचा सशास्त्र परिचय या पाठ्यपुस्तकात प्रकरणश: करून देण्यात आलेला आहे. यामुळेच आधुनिक भाषाविज्ञानावरील एक प्रमाणित पाठ्यपुस्तक म्हणून या पुस्तकाकडे अंगुलीनिर्देश करता येईल. -डॉ. हे. वि. इनामदार