“भाषांतरे करीत असताना भाषांतर मीमांसेचाही अभ्यास कारणपरत्वे होत राहिला. त्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होत गेल्या. तौलनिक साहित्याच्या अभ्यासालाही त्या उपयुक्त होत्या. भाषांतराचे शास्त्र असते हे लक्षात आले; पण त्या शास्त्राचा अभ्यास करून उत्तम भाषांतरकार होता येईल असे मात्र वाटले नाही. भाषांतर कुणासाठी हा विचारच निर्णायक ठरतो. भाषांतरमीमांसा अनेक प्रश्न उभे करते आणि त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करते. यासाठी ती इतर अनेक ज्ञानशाखांना स्पर्श करते. भाषांतरमीमांसेला अनेक फाटे फुटू शकतात आणि अनेक सिद्धांतांच्या कल्लोळात एकप्रकारची आपले मत मांडण्याची लोकशाही अनुभवाला येते. अशा अभ्यासाच्या गरजेतून जे काही लेखन झाले त्याचा संग्रह येथे केला आहे.”– ‘प्रस्तावने’तूनप्रा. निशिकांत ठकार हे हिंदीतून मराठीत व मराठीतून हिंदीत अशी दुतर्फा भाषांतरे करणारे व भाषांतरविज्ञानावर मौलिक लेखन करणारे टीकाकार आहेत. हिंदीतील भाषांतरांमुळे त्यांना देशपातळीवर ख्याती प्राप्त झालेली आहे. भाषांतरांबरोबरच साहित्याचे मार्मिक टीकाकार म्हणूनही ते मराठी-हिंदीत सुपरिचित आहेत. आत्तापर्यंत हिंदी व मराठीत मिळून त्यांची सुमारे ३५ पुस्तके प्रकाशित असून त्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरावर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.