एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात अनेक क्रांतिकारक आणि समाजसुधारक होऊन गेले – ज्यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी अहोरात्र प्रयत्न केले. भारतात ईस्ट इंडिया कंपनी आल्यानंतर अठराव्या शतकाच्या अखेरीस समाजपरिवर्तन आणि लोकसहभागाच्या चळवळीची सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध भारतीय नेत्यांनी वाचा फोडली. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, साने गुरुजी असे महान, द्रष्टे नेते आणि समाजसुधारक उदयास आले- ज्यांनी आधुनिक भारताचा पाया रचला. महाराजा सयाजीराव गायकवाडांसारखे संस्थानिक स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे बनले आणि त्यांनी शेकडो क्रांतिकारकांना मदत केली; तसेच भारतात सामाजिक सुधारणांची मुहूर्तमेढ रोवली. आजच्या तरुण पिढीला या क्रांतिकारकांच्या व समाजसुधारकांच्या कार्य आणि समर्पणाची ओळख होणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारकांच्या बलिदानाचा जसा ज्वलंत इतिहास आहे; तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंडातील समाजसेवकांच्या त्यागाची व समर्पणाची गाथा मोजक्या शब्दांत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. निबंधलेखन, वक्तृत्व, भाषणे व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठीही प्रस्तुत पुस्तक मार्गदर्शक ठरेल.