साने गुरुजींनी बाल-कुमारांसाठी लिहिलेल्या बापूजींच्या गोड गोष्टी लहानथोर सर्वांनाच अतिशय वाचनीय आहेत. मुलांचे मनोरंजन करणे म्हणजे देवाशी नाते जोडणे असे गुरुजी मानीत. या ‘गोड गोष्टी’ मनोरंजक तर आहेतच; पण अतिशय उद्बोधकही आहेत. गुरुजींसारख्या सहृदय आणि गांधीजींच्या ठायी नितांत श्रद्धा असणाऱ्या थोर लेखकाने लिहिलेल्या या गोष्टी आजच्या पिढीला फारच उपयुक्त आहेत, हितकारक आहेत. गांधीजींच्या जीवनातील विविध प्रसंगांचे दर्शन घडवून त्याद्वारे मनावर उत्तम संस्कार करण्याची शक्ती त्यांच्यात आहे.या गोष्टी मनापासून वाचणाऱ्या वाचकांची मने द्वेषमत्सरांपासून मुक्त होतील, विशाल होतील आणि त्यांची सहानुभूती व्यापक आणि डोळस होईल. गांधीजी म्हणजे गुरुजींच्या जीवनातील सूर्य. त्यांच्या तेजावर आपली चिमुकली ज्योत प्रज्वलित करण्याचा व आपले जीवन प्रकाशमय करण्याचा साधा, सोपा मार्ग साने गुरुजींनी दाखविला आहे.