एक सर्वसाधारण खेडे हेच ह्या कादंबरीचे नायकत्व स्वीकारते. त्याच्या सर्वसाधारण अस्तित्वाचा, उभारणीचा, पडझडीचा आणि उद्ध्वस्ततेचा हा इतिहास आहे. गतकालीन घटनांना केंद्रस्थानी ठेवून येथे एक स्मरणचिंतन व्यक्त झाले आहे. मराठीत यापूर्वी अशा प्रकारचे ललित-लेखन फार अभावाने झाले आहे. येथे संपूर्ण ग्रामजीवन उभे राहते. त्या गावाचे स्वत:चे सांस्कृतिक जगणे, रूढी, परंपरा, भाषा, बोली यांसह येथे व्यक्त झाले आहे. गावाचे वैशिष्ट्य आणि त्याचे जगणे केवळ चित्रित होत नाही, तर लेखकाचे त्या गावाशी असणारे अद्वैत नाते व एकरूप होणारे व्यक्तिमत्वही येथे स्पष्ट होते. मानवसमूहाची कहाणी समजून घेताना अशी कलाकृती कलात्मक आनंद देतानाच अंतर्मुख करते. म्हणूनच ‘बखर एका खेड्याची’ ही मराठीतील एक श्रेष्ठ कलाकृती आहे.