शिक्षण ही ज्ञानाधिष्ठित समाजाच्या विकासासाठी आवश्यक गोष्ट आहे. भारतीय समाज हा ज्ञानाधिष्ठित समाज म्हणून सतत विकसित होत राहिला आहे. त्यातूनच आज भारत ज्ञान-महासत्ता बनण्याच्या वाटेवर आहे. ज्ञानाधिष्ठित, संतुलित, सुसंस्कृत व सर्वसमावेशक समाजनिर्मितीसाठी शिक्षण हे अंतिम लक्ष्य आहे. राज्यसभेचे विमान सदस्य असलेले डॉ. जनार्दन वाघमारे यांचा मूळ पिंड शिक्षणतज्ज्ञाचा आहे. पाश्चिमात्य भाषांचे अभ्यासक, प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू या भूमिकेतून त्यांनी भारतातील शिक्षणपद्धतीविषयी अतिशय मूलगामी संशोधन व चिंतन केले आहे. ह्या क्षेत्रातील डॉ. वाघमारे यांची प्रयोगशीलता, चिकित्सक अभ्यास वृत्ती व एकूणच शिक्षणक्षेत्राविषयी त्यांच्याजवळ असलेली आस्था व तळमळ यांतूनच ह्या पुस्तकातील लेख सिद्ध झालेले आहेत. शिक्षणप्रक्रिया ही आज बदलाच्या उंबरठ्यावर उभी आहे. ह्या बदलत्या स्वरूपांमुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत. ह्या सर्व गोष्टींची सविस्तर चर्चा प्रस्तुत पुस्तकात लेखकाने केली आहे.