किशोर मेढे यांच्या ‘अस्तित्वाचे आकाश’मधील कविता ही भिन्नपदरी आहे. सामाजिक बांधिलकी हा या कवितेचा पाया आहे. आंबेडकरी विचारांच्या ऊर्जाकेंद्रातून निर्माण झालेली ही कविता समतोलपणे सूचक भाष्य करीत जाते आणि सभोवतालच्या समाजवास्तवाला लख्खपणे भिडते. जगण्याचे प्रश्न मांडताना ही कविता अंतर्मुख होत जाते आणि
आत्मशोधाबरोबरच समाजशोध घेताना दिसते. या कवितेला प्रतिमांचा सोस नाही, तर विचारांचा ध्यास आहे. स्वीकृत विचारांच्या धारेवर हा कवी स्वत:ला तपासत जातो आणि समाजमनाचाही वेध घेतो, हे या कवितेचे बलस्थान आहे.
- डॉ. मनोहर जाधव