‘अनुष्टुभ्’ द्वैमासिकाची वाटचाल ‘रौप्य महोत्सवी’ वर्षाची झाली. गेल्या पंचवीस वर्षांत ललित आविष्कार, साहित्यविषयक प्रश्नांची सैद्धांतिक चर्चा व साहित्यकृतींची समीक्षा म्हणजेच कला, सर्वांनाच या द्वैमासिकात स्थान मिळाले. ‘अनुष्टुभ्’ परिवार प्रारंभापासूनच मान्यवर विचारवंत,समीक्षकांचा आहे. त्याशिवाय नवोदित व मान्यवर ललित लेखक-समीक्षकांनी ‘अनुष्टुभ्’चा दर्जा उंचावण्याचे काम सातत्याने केले आहे. नवसमीक्षेची पाळेमुळे ‘अनुष्टुभ्’मुळेच मराठी साहित्यात रुजलेली दिसतात. या द्वैमासिकातून अनेक मान्यवर समीक्षकांनी नवसमीक्षेचा पाया भक्कम केला आहे. एकंदरीत ‘अनुष्टुभ्’ची पंचवीस वर्षांची कारकीर्द पाहता सूचीच्या माध्यमातून उभा केलेला हा आलेख अभ्यासकांना निश्चितच उपयुक्त ठरेल, असे वाटते.