भुसावळ - जळगांव - नाशिक - पुणे - मुंबई - न्यूयार्क – शिकागो असे स्थलांतर करणार्या पात्रांची ही कहाणी कुणा एकाची भ्रमणगाथा नसून अनेकांची आहे. एखाद्या विशाल ग्रहमालेचा आस ढळल्यामुळे एकमेकांवर आपटणारे ग्रहगोल एक गतिमान, बिलोरी चित्र निर्माण करतात. या संभ्रमकारक परिस्थितीतही ढळलेला आस शोधण्याची - वा नवा केंद्रबिंदू प्रस्थापित करण्याची - या माणसांची जिद्द या कादंबरीत रेखाटलेली आहे. मराठी माणसांचे विश्व किती झपाट्याने बदलले आहे, बदलत आहे, याची निखळ प्रचिती या कादंबरीमध्ये मिळते. वैश्विकीकरणाच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही माणसं संचित नाहीत, सारांश नाहीत, परक्याचं ती स्वागत करतात; परंतु त्याचबरोबर आपलं स्वत्व - जात, पोटसमूह इत्यादी - ती निर्मळपणे स्वीकारतात, साजरी करतात. देशी - परदेशी हे द्वैत केव्हाच कालबाह्य झालं आहे. कादंबरीतील रॅचेल ही स्त्री - पूर्वजन्माची रत्ना - देशी की परदेशी? अद्ययावत महाराष्ट्राचा नकाशा व त्याने फेकलेले दूरदूरचे धागे, यांची अधिक तपशीलाने माहिती करून घ्यायची असल्यास ही कादंबरी वाचा. - विलास सारंग