अमेरिकेत जी युरोपियन माणसं गेली त्यांनी निघृणपणे रेडइंडियनांची वासलात लावली. पुढंही युरोपियन माणसं एकमेकांना मारू लागली. नवनवीन भूप्रदेशात संपत्तीच्या हव्यासानं नव्या सीमा खुल्या करताना आपल्या संपत्ती मिळविण्याच्या हव्यासाची पूर्ती करण्याचा एक मार्ग म्हणून ही माणसं दुसर्या माणसांचे मुडदे पाडत होती. यासाठी जगातल्या सर्वांत जास्त आणि धनिक गुन्हेगार देशातील गुन्हेगारीची माहिती करून घेतली तर आपल्याकडच्या गुन्हेगारीची सुरुवात आणि वळणं आपोआपच लक्षात येतील. म्हणूनच या पुस्तकात अमेरिकन गुन्हेगारीच्या सुरुवातीचा काळ घेतलाय. काही काळानं या क्रूर गुन्हेगारांभोवती दंतकथांचं वलय कसं निर्माण होतं तेही आपल्या लक्षांत येईल. सामाजिक विषमता आणि अन्याय यांनी गुन्हेगारी निर्माण होते असं म्हटलं जातं ते कितपत खरं आहे, यावरही प्रकाश पडेल. ते सगळं नकोसं वाटत असलं तरी ते वास्तव आहे, हेही लक्षात ठेवायला हवं. अमेरिकन गुन्हेगारीचा इतिहास मराठीत आणायच्या प्रयत्नाचा हा पहिला भाग आहे. पुढे असे आणखीही भाग प्रकाशित करून विशेषत: खास अमेरिकन सुबत्तेत रुजलेल्या आणि वाढलेल्या ‘सिरियल किलर्स’वरही प्रकाश टाकायचा विचार आहे.– निरंजन घाटे