स्पर्धा परीक्षा म्हणेज संयम आणि प्रयत्नांचीच परीक्षा. पण जिद्द आणि मेहनतीची तयारी असल्यास यश पायाशी लोळण घेतं, याचं उदाहरण म्हणजे आयएएस विजय अमृता कुलांगे. कुलांगे यांच्या ‘आजचा दिवस माझा’ पुस्तकातून त्यांच्या याच यशाची गुरूकिल्ली आपल्या समोर येते. ग्रामीण व शहरी भागांतील विद्यार्थ्यांनी खडतर परिस्थितीतही जिद्द न सोडता संकटांवर मात करून यश कसं संपादन करायचं, याचा वस्तुपाठ म्हणजेच लेखकाचे जीवन. प्राथमिक शिक्षक ते आयएएस अधिकारी हा प्रवास अगदी थक्क करणारा. काळाच्या मुशीत तावून सुलाखून निघालेले लेखकाचे आयुष्य आपणा सर्वांपुढेच सकारात्मकतेचा, प्रसन्नतेचा व नवनवीन आव्हानांचा दीप प्रज्वलित करते. जीवनजाणिवा समृद्ध करते.