डॉ. सुधीर रा. देवरे हे भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाङ्मय यांचे अभ्यासक आहेत. अहिराणी ही त्यांची मातृभाषा आहे. त्यामुळेच अहिराणीसंबंधी अनेक अज्ञात गोष्टींची ते अचूक माहिती देतात. ‘अहिराणीच्या निमित्ताने : भाषा’ ह्या पुस्तकातील मूळ लेख मराठी भाषेत आहेत आणि या पुस्तकाचे माध्यमही मराठी भाषा आहे. हा लेखसंग्रह अहिराणीच्या निमित्ताने असला, तरी यातील अनेक घटकांगे महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील सर्वच बोलीभाषांवर आणि प्रमाणभाषांवरही भाष्य करतात. स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून भारतातील सर्वच बोलीभाषा,लोकसाहित्य, आदिवासी साहित्य, लोकसंस्कृती, लोकजीवन आदी क्षेत्रांतील भाषाभ्यासकांना व संशोधकांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, याची खात्री वाटते.