स्वामिनी बनल्या. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली, दुःखाला त्यांना सामोरे जावे लागले; पण न डगमगता त्यांनी प्रजेची सेवा हे व्रत अंगिकारले.अहिल्याबाई शूर लढवय्या, चांगल्या रणनीतीज्ज्ञ आणि न्यायवृत्तीच्या होत्या. अन्यायाची त्यांना चीड होती. त्यांनी धर्माचरण आणि राजकारणाची सुयोग्य सांगड घातली. कर्तव्यनिष्ठा, धर्मनिरपेक्षता, तसेच त्या केवळ राजमाता न राहता लोकमाता ठरल्या.त्यांचे जीवनही अत्यंत साधे, सरळ आणि निर्मळ होते. त्यातूनच त्यांनी सर्वसामान्य रयतेच्या हिताचा सदैव विचार केला. महेश्वर ही त्यांची राजधानी. श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व ओळखून महेश्वरमध्ये वस्त्रोद्योगास प्रोत्साहन दिले.अहिल्याबाई उच्चकोटीच्या दानशूर होत्या. काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत अनेक मंदिरांचा त्यांनी जिर्णोद्धार केला, तीर्थस्थळी धर्मशाळा बांधल्या, पिण्याच्या पाण्यासाठी हौद बांधले. नदीकाठी घाट बांधले आणि गरिबांसाठी अन्नछत्रे उभारलीत. जनसेवेची ही अगणीत कामे करणाऱ्या अहिल्याबाईंनी त्यांचा महेश्वर येथील राजवाडा आणि निवास साधे सर्वसाधारण प्रजेच्या घरांसारखे बांधले. त्यांचे राहणीमानही साधेच होते.