कवितांच्या मागे मागे, मीही जवळजवळ चार तपे चालून राहिलो आहे. मग त्या माझ्या असोत वा इतरांच्या. त्या विविध ढंगांच्या आहेत. या कविता कुठे घेऊन जाताहेत - कशामुळे - याचा कधी कधी धांडोळा घ्यावासा वाटतो. आवडलेल्या कवितांच्या मागून जायचे, त्यांनी दाखविलेल्या वाटेचा शोध घ्यायचा अशी भूमिका घेतल्यावर ते लेखन एखाद्या लेखात बंदिस्त करणे शक्य होणार नाही. शिवाय कवितांचे किती ढंग, किती तर्हा! एका लेखात एखाद्या तर्हेचा - कवितेच्या एखाद्या विशेषाचा मागोवा घ्यायचा म्हटला, तरी तर्हेतर्हेच्या विशेषांसाठी अनेक लेखांकांची माळच गुंफायला हवी. त्या त्या विशेषांच्या संदर्भात माझ्या मनामध्ये पटकन जाग्या झालेल्या, त्या विशेषाचे विविध पैलू दाखवणार्या कविता उद्धृत करून, त्या विशेषाचा वेध घेणे हा या लेखनाचा उद्देश आहे. त्या मिषाने मला आवडलेल्या कवितांचा आनंद तुम्हालाही देता येईल अशी मला आशा आहे.