आजच्या काळात जन्माला आलेल्या आणि वाढणाऱ्या मुलांच्या जीवनात पालकांची आणि शिक्षकांची भूमिका काय असावी हे समजून घेणे गरजेचे आहे. तिथे जर आपली गफलत झाली तर पाहता पाहता गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात. शारीरिक भूक ही कितीही नैसर्गिक जरी असली तरी ती 'जबाबदार' असणं हेसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. बेजबाबदार लैंगिक वर्तन व जबाबदार लैंगिक वर्तन यातला नेमका फरक काय हेच अनेकांना माहीत नसतं. अशा अज्ञानामुळे सरसकट तमाम लैंगिकतेचाच समूळ अव्हेर करण्याचे अनैसर्गिक सल्ले पालकवर्ग मुलांना देत राहतात व असे सल्ले पाळले जातील अशी भ्रामक समजूत करून घेतात. मुळात पालक आणि मुलांमध्ये संवाद असेल तर नात्यात सामंजस्य असतं, असं म्हणतात. मात्र सध्या त्याचीच वानवा जास्त दिसते आहे. विशेषतः लैंगिक विषयाबाबतीत. मुलं आणि पालक यांच्यात ही दरी का आहे, सुजाण पालकत्व म्हणजे नेमकं काय आणि 'परिणामांचं तारतम्य' समजून घेऊन पालक मुलांशी कसा संवाद साधू शकतील यांची विस्तृत चर्चा या पुस्तकात केली आहे.