सामाजिक समस्यांचे थेट प्रक्षेपण, सामाजिक बांधिलकी, विद्रोह व त्यातून आलेली आक्रमकता हे सर्व संकेत टाळून अभय मुलाटे यांची कविता त्यांच्या आवाक्यात आलेल्या सामाजिक वास्तवाचे नेमकेपणाने चित्रण करते. मुळात कवीचा स्वत:शी चाललेला संघर्ष आणि संवाद हा या कवितांचा गाभा आहे. भोवतालची आधुनिक संस्कृती, तिचा धनलोभ, माणसाचे एकाकीपण, कंटाळवाणेपणा, असुरक्षिततेची भावना, मरणाची सूप्त धसकी, निरस कौटुंबिक आणि सामाजिक जीवन यांचा निषेध करत हा कवी भुतकाळातल्या आदिम चैतन्याकडे वळतो. आपल्या पूर्वजांच्या जीवनशैलीत या चैतन्याचा शोध घेतो. आपण या आधुनिक संस्कृतीच्या चौकटीत नेमकेपणाने बसत नाही, ही जाणीव या सर्व कवितांमध्ये फार तीव्र आहे. त्यांच्या कवितेची भाषाशैलीही खास आहे. त्यांनी स्वत:ची अशी एक संयत, सुसंस्कारित, सुबक अशी भाषा विकसित केली आहे. त्यांच्या कवितेतील अभिजाततेला आणि चिंतनशीलतेला अनुरूप अशीच ही शैली आहे.