चित्रा मुदगल या हिंदीतील नावाजलेल्या लेखिका. विद्यार्थीदशेपासूनच त्यांचा कामगार चळवळींशी अगदी जवळून संबंध आला. कामगारांच्या आणि विशेषत त्या समाजातील स्त्रियांच्या समस्या त्यांनी जवळून पाहिल्या; अनुभवल्या. त्या सर्व अनुभवांचा परिपाक म्हणजे त्यांची ‘आवा’ ही कादंबरी.आवा - म्हणजे कुंभाराची भट्टी. कादंबरीत ही भट्टी प्रतिक बनून निरनिराळ्या रूपांत वाचकांसमोर येते. कामगारांच्या दैनंदिन जीवनात परिस्थितीचे चटके देणारी भट्टी, चंगळवादी समाजाची जणू खाजगी मालमत्ता भासणारी पश्यांची ऊब देणारी भट्टी, आपल्याला निव्वळ उपभोग्य वस्तू मानणाऱ्या समाजाला खडसावू पाहणारी स्त्री-क्षमतेची भट्टी आणि भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणवर्गाच्या मानसिकतेची भट्टी.