‘मराठी वंचित साहित्यात ‘खाली जमीन, वर आकाश’, ‘दुःखहरण’, ‘निराळं जग, निराळी माणसं’सारख्या सरस साहित्यकृतींचे योगदान देणाऱ्या डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे हे ‘आत्मस्वर’ पुस्तक दुसरे आत्मकथनच होय. हा रूढ अर्थाने आत्मकथनात्मक लेख व मुलाखतींचा संग्रह असला तरी तो डॉ. लवटे यांनी केलेल्या वंचित विकास कार्यामागील प्रेरणा व भूमिका स्पष्ट करतो. हा माणूस परंपरेची कोरी पाटी घेऊन जन्मला तरी त्याने आपल्या कार्य-कर्तृत्वाने महिला व बालविकास, सामाजिक न्याय, मानवाधिकार, शिक्षण, साहित्य, संशोधन, भाषांतर, संपादन, वस्तुसंग्रहालय निर्मिती इत्यादी क्षेत्रात स्वतःच्या स्वतंत्र विचार, व्यवहाराने एक अनुकरणीय परंपरा निर्माण केली. ती समजून घ्यायची तर त्यामागील हा ‘आत्मस्वर’ एकदा तरी वाचून आत्मसात करायलाच हवा.