गांधीजींच्या मते नैसर्गिक उपचाराचे दोन पैलू आहेत, पहिला रामनामाने रोग बरा करणे आणि दुसरा म्हणजे रोग होणारच नाही असे इलाज करणे, हे उपाय अत्यंत साधे; पण तितकेच तातडीने करावयाचे आहेत. हे उपाय त्या काळी जितके संयुक्तिक होते तितकेच ते आजही आहेत, जसे शरीराची, घराची आणि गावांची स्वच्छता, युक्ताहार, आवश्यक तितका व्यायाम आणि प्रामुख्याने अंतःकरणाची स्वच्छता. शरीर हे पंचमहाभूतांचे बनलेले असल्यामुळे त्यांनी विविध रोगांवर निसर्गोपचाराचा आग्रह धरला आहे. हवा, पाणी आणि माती यांचे इतके साधे-सरळ उपयोग या पुस्तकात आहेत की कोणालाही ते विनामूल्य करून रोगमुक्त होता येते.पुस्तकाच्या दुसऱ्या भागात गांधीजींच्या विधायक कार्यक्रम आणि मंगल प्रभात या लिखाणाचा समावेश केला आहे. सत्य आणि अहिंसात्मक साधनांनी पूर्ण स्वराज्य किंवा संपूर्ण स्वातंत्र्याची रचना करणे म्हणजे विधायक कार्यक्रम, ग्रामसफाई, प्रौढ शिक्षण, शेतकरी, मजूर विद्यार्थी, स्त्रियांची सेवा असे अनेक मुद्दे आजही कालबाह्य उरलेले नाहीत; तसेच समाजाच्या विविध अंगांना आवरून घेणारे हे लिखाण आणि येरवडा तुरुंगात गांधीजींनी दर मंगळवारी दिलेल्या प्रवचनांना शब्दरूप देऊन गांधीजींच्या पवित्र स्मृतीला नम्र अभिवादन करण्याचा प्रयास या पुस्तकात केला आहे.