पक्षी म्हणजे आकाशाचे अनभिषिक्त सम्राट! चपळाईने, वेगाने गगनात भरारी घेणाऱ्या या पक्ष्यांना पाहूनच मानवाला विमानाचा शोध लावता आला. भूतलावरील नाना प्रकारच्या, नाना जातींच्या पक्ष्यांचं अनोखं विश्व पाहिलं, म्हणजे निसर्गाचं आश्चर्य वाटतं. प्राचीन काळी प्रचंड देहयष्टीचे उंच हत्ती पक्षी होते. परंतु ते पक्षी काळाच्या उदरात नामशेष झाले. शहामृग, एमू, किवी यांसारखे उड्डाण करता न येणारे पक्षी आहेत, तिथे हजारो किमी. अंतर पार करणारे सारस, रोहित, आर्क्टिटसारखे पक्षीही आहेत. हिंमगबर्डसारखा सर्वांत छोटा पक्षी जसा भूतलावर आहे, तसे गरुडासारखे बलदंड, शिकारी पक्षीही आहेत. बैलाच्या शिंगासारखी भलीमोठी चोच असलेला टाऊकन पक्षी हा निसर्गाची देणगी आहे. सुंदर पिसा-याचा मोर, चित्ताकर्षक रंगाचे पोपट, कुहुकुहु आवाज काढणारा कोकीळ, माळरानाचे वैभव असलेला माळढोक, सुंदर सारस अशा कितीतरी पक्ष्यांनी वसुंधरेचं वैभव वाढवलं आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांची शास्त्रीय व मनोरंजक माहिती वाचकांना नक्कीच भुरळ घालेल.