‘आलेख’ हा रणजित देसार्इंचा ग्रामीण जीवनावर आधारित कथांचा संग्रह. गाव वरवर जरी शांत वाटले तरी अंतरंगात कितीतरी घडामोडी चाललेल्या असतात. गावची चावडी, पार, हिरवेगार मळे, चिरेबंदी वाडे, गरिबाची झोपडी, डोंगरमाथे, करवंदांच्या जाळ्या ही घटनांची केंद्रस्थळं. गावातली तहेवाईक, इरसाल, बेरकी, गरिबीने गांजलेली, देवभोळी, अंधश्रद्धाळू माणसं! निसर्ग आणि जनावरं यांच्याशिवाय त्यांच्या जीवनाला पूर्णत्व येतच नाही. ही माणसं त्यांच्या ईर्षा, त्यांचा बाणेदारपणा, यातना, मुलांवरची माया, शहरवासीयांशी त्यांचे येणारे संबंध, सर्व सच्चेपणाने जगतात, निभावतात. निसर्ग आणि जनावरांशी एकरूप झालेली ही माणसं त्यांच्या रंगरेषांसह देसाई यांनी आपल्या लेखणीतून तितक्याच सच्चेपणाने चितारलेली आहेत.