सुरस आणि चमत्कारिक गोष्टी ऐकायला कुणाला आवडत नाहीत. उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी दिवसा, तर कधी रात्री आजी आपल्या नातवंडांना गोष्टी सांगायला घेऊन बसते. ही नातवंडं तिच्या खेड्यात सुट्टी घालवायला आपल्या आजीकडे आलेली असतात. आजीने आपल्या गोष्टींची पोतडी उघडल्यावर सगळे जण तिच्याभोवती गोळा होतात. आजीच्या पोतडीतून राजाच्या आणि भामट्यांच्या, माकडांच्या आणि उंदरांच्या, अस्वलाच्या आणि देवाच्या अशा असंख्य गोष्टी निघतात. त्यात एक अस्वल खूप वाईट खीर खाऊन चिडतं. तर कधी गोष्टीतला माणूस इतका आळशी असतो की समोर आग लागलेली दिसत असूनसुद्धा ती विझवण्याचे कष्ट घेत नाही आणि अखेर स्वत:ची दाढी पेटल्यावर घाबरतो! कधी एका राजकन्येचं कांद्यात रूपांतर होतं... एक राणी रेशमी वस्त्र बनवण्याच्या कलेचा शोध लावते. प्राण्यांचे आणि माणसांचे विविध नमुने या गोष्टींमधून आपल्याला भेटतात... आजीच्या या गोष्टी मनोरंजक तर आहेतच; पण करमणुकीबरोबरच त्या मुलांना खूप काही ज्ञान देऊन जातात. चला तर, या गोष्टींचा आनंद लुटू या!