डॉ. लिली जोशी (एम्.डी.) ह्या गेली पंचवीस वर्षे वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहेत. आरोग्य-शिक्षण ह्या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. आजची बदलती चाळिशी हा लेख नोव्हेंबर १९९७ साली प्रथम साप्ताहिक सकाळमध्ये प्रसिद्ध झाला. त्या लेखाने अनेक वाचकांचे कुतूहल जागृत केले. वाचकांची पत्रे, दूरध्वनी आले. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून प्रतिक्रिया नोंदविल्या. भारतीय सामाजिक परिस्थितीच्या जवळ जाऊन प्रौढत्व आणि वार्धक्याचं दर्शन घडवील अशी एक प्रश्र्नावली तयार करून डॉ. लिली जोशी यांनी एक पाहणी केली. ह्या पाहणीचे निष्कर्ष आणि त्यांच्या वैद्यकीय व्यवसायातील अनुभव यातून हे पुस्तक साकार झाले आहे. चाळिशी आणि नंतरच्या एकूणच जीवनप्रणालीविषयी, त्याचप्रमाणे आहारशास्त्र, व्यायामशास्त्र, कामजीवन, मृत्यु-संकल्पना आणि अर्थकारण यांचाही विचार ह्या पुस्तकात केलेला आहे. ह्यात 'रेडिमेड' उत्तरं नसली तरी मार्गदर्शन निश्चितच मिळेल, आपली जीवनशैली ठरविण्यासही उपयुक्त ठरेल आणि ह्या पुस्तकाचा उद्देश साध्य होईल; तो म्हणजे- 'निरामय, सुखी, कार्यक्षम प्रौढजीवन !'