आ. ना. पेडणेकर एक कथालेखक म्हणून कोणतीही झापडं न लावता एक स्वच्छ, नितळ दृष्टीनं जीवनाकडे पाहत होते. त्यांनी निवडलेले विषय विविध होते. त्यांच्या वृत्तीतली व
शैलीतली विविधताही वेगवेगळ्या अंगांनी कथा बहरायला उपयुक्त होती. ते मिश्किल होते. खास मालवणी मिश्किलपणा त्यांच्या कथेत येतो. माणसांच्या वागणुकीचे कंगोरे,
माणसाने लपवलेले असे काही ते सहजपणे उघडे करतात. त्याचवेळी आपल्या जगण्याला गुदमरवून टाकणारे अनेक प्रश्न या कथांना आशयद्रव्य पुरवतात. त्यांतून वाचकाला अंतर्मुख
करणारं जीवनभाष्य सोपेपणानं मांडलं जातं. झपाटून टाकणारी निवेदनशैली आणि आशयावरील मजबूत पकड यामुळे या कथा अतिशय जोरकस उतरलेल्या आहेत.