प्रशांत पवार यांचा वारसा मुळातच फुले- आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित असल्याने व दया पवार यांचे चिरंजीव म्हणून सामाजिक परिवर्तनाचे बाळकडू लहानपणीच मिळाल्याने त्यांच्या लिखाणातून ही विचारधारा 31 ऑगस्ट, 1852 या पुस्तकामध्ये जवळपास प्रत्येक ठिकाणी ठळकपणे दिसून येते. गुन्हेगार जमातीच्या घरी जाऊन, मुक्काम करून त्यांच्या जातिप्रथेच्या, जातपंचायतीच्या किती खोलवर जखमा हा समाज भोगतोय, याचे वासतवरूप जेव्हा प्रशांत पवार पुस्तकात मांडतात तेव्हा ते वाचताना अंगावर शहारे येतात. एक डोळस पत्रकार विमुक्त भटक्यांच्या सुखदु:खांचे कसे वर्णन करतो, तो किती खोलवर जाऊन या लोकांना अभ्यासतो हे वाचण्यासारखे तर आहेच; पण त्याही पलीकडे जाऊन समाजातील खालच्या पातळीवर गावगाड्याबाहेरील, दलितांपेक्षाही दलित असणार्या या लोकांमध्ये फुले-आंबेडकरी विचाराने कसे परिवर्तन घडवता येईल, हे विचार अत्यंत तळमळीने या पुस्तकात त्यांनी मांडले आहेत.