सोलापूरच्या, कानडी ढंगाने मराठी भाषा बोलणाऱ्या शशी भागवताने मराठी विषय घेऊन कसाबसा मुंबईच्या विल्सन कॉलेजात प्रवेश मिळविला... आणि आठ दिवसात प्रा. बा. ल. कुल्कर्ण्यांनी त्याला 'मराठी' च्या बाहेरची वाट दाखवली. तो मानभंग मला बोचला आणि मला लेखक करून गेला, पण नाही! मी लहानपणी शाळेतही काहीबाही लिहीत होतोच पण तरीही हे तेवढ्यामुळेच घडले असावे, असेही नाही ... त्याला अगम्य, अतर्क्य असे काही वेगळेच कारण असावे - मागील जन्मी माझे हे अपूर्ण राहिलेले कर्म हि असण्याचा संभव आहे, म्हणजे हा पुनः जन्म ...? होय, पुनःजन्मावर निदान माझा तरी विश्वास आहे... त्या शिवाय कर्म ह्या गोष्टीला काही अर्थ नाही. आज ह्या 'रक्तरेखे' ला साक्षी ठेवून मी संकल्प सोडतो आहे... मी आज लिहिणार आहे, ते पुनः जन्मावर...!